अरविंद केजरीवाल-शरद पवार भेटीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सोलापूर : आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवालांनी शरद पवार यांच्याबद्दल असे असे शब्द वापरले होते की ते मी वापरू शकत नाही, अशा शब्दात फडणवीसांनी केजरीवाल-पवार भेटीवर टीका केली आहे.
अरविंद केजरीवालांनी शरद पवार यांच्याबद्दल असे असे शब्द वापरले होते की ते मी वापरू शकत नाही. पंतप्रधान मोदी यांचा विरोध करण्यासाठी हे सगळे एकत्र येत आहेत. परंतु, यांनी कितीही विरोध केला तरीही, मोदींवर जनतेचा विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.
भारताचा मानसन्मान काय आहे ते पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यात दिसला आहे. ज्याप्रमाणे पापुआ न्यू गिनी यांनी स्वागत केले आणि त्या देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींना बॉस म्हटलं. अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणाले, मोदींची सिग्नेचर मला घ्यायची आहे. मोदींचा कार्यक्रम घेतला तर त्याचे पासेस कसे घ्यायचे, असा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो.
परदेशातील लोकांनी आणि भारतीयांनी ज्या प्रकारे त्यांना डोक्यावर घेतलाय, आपल्या देशाचा नेता आज वैश्विक नेता झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. याचा खरोखर सर्वांना आनंद झाला पाहिजे. मात्र, काही लोकांना आनंद होत नसून त्यांच्या पोटात दुखत आहे. त्यांच्या कितीही पोटात दुखलं तरी मोदी वैश्विक नेते झाले आहेत व आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, असाही निशाणा फडणवीसांनी विरोधकांवर साधला आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवालांच्या भेटीनंतर शरद पवार म्हणाले की, संसदीय लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या राज्य सरकारकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. निवडून आलेले सरकारचे अधिकार वाचविण्यासाठी हा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले आहे.