बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराने आणि अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांनी संपूर्ण उपखंडात चिंता वाढवली असून, त्याचे थेट पडसाद भारताची राजधानी दिल्ली येथे उमटले आहेत. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटनांच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली असून, परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली होती.
बांगलादेशात सध्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडलेली असल्याचे चित्र समोर येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडीओंमध्ये हिंदू नागरिकांना लक्ष्य केल्याचे, तसेच भारताच्या दूतावासावर थेट दगडफेक झाल्याचे दृश्य दिसून येत आहेत. या घटनांमुळे भारतात संतापाची लाट उसळली आहे.
उच्चायुक्तालयाबाहेर आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर हिंदू संघटनांनी मोर्चा काढत बांगलादेश सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांची संख्या वाढत गेल्याने परिसरात तणाव निर्माण झाला. काही आंदोलक आक्रमक झाल्याने पोलिसांना अतिरिक्त फौजफाटा तैनात करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभी केली, तरीही आंदोलनकर्ते मागे हटायला तयार नव्हते.
भारत सरकार सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाची हालचाल
बांगलादेशातील परिस्थिती आणि भारतातील वाढलेली सुरक्षा चिंता लक्षात घेता, मंगळवारी सकाळी भारताचे बांगलादेशातील उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. या बैठकीला भारताचे उप उच्चायुक्तही उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील विविध ठिकाणी असलेल्या बांगलादेशी दूतावासांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात आली.
आंतरराष्ट्रीय पातळीवरही लक्ष
बांगलादेशातील हिंसाचारावर केवळ भारतच नव्हे, तर अमेरिकेनेही बारकाईने लक्ष ठेवले आहे. बांगलादेशातील प्रमुख नेते मुहम्मद युनूस यांनी अमेरिकेला सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली असून, कोणत्याही परिस्थितीत फेब्रुवारीमध्ये निवडणुका होणार असल्याचा दावा केला आहे.
भारत-बांगलादेश संबंध तणावात
सध्या भारत आपल्या शेजारी देशांतील घडामोडींवर अलर्ट मोडवर आहे. बांगलादेशातील अस्थिरता, पाकिस्तानशी वाढते संबंध आणि अमेरिकेची भूमिका यामुळे भारत-बांगलादेश संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात बांगलादेश या संकटातून कसा मार्ग काढतो आणि भारत त्यावर कोणती राजनैतिक भूमिका घेतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
बांगलादेशातील हिंसाचाराविरोधात दिल्लीत उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने
हिंदू संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी, परिसरात तणाव
परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालय सतर्क, राजनैतिक हालचाली वाढल्या