Delhi Pollution 
देश-विदेश

Delhi Pollution: दिल्लीवर प्रदूषणाचा कहर; 50 मीटर दृश्यमानता, AQI धोक्याच्या टप्प्यावर

Air Quality Alert: दिल्लीतील हवा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दृश्यमानता ५० मीटरवर, AQI ५०० वर. ग्रॅप-४ निर्बंध लागू, विमान उड्डाणे रद्द, रस्ते वाहतूक संथ.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

दिल्लीतील हवा पुन्हा एकदा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली असून राजधानी सध्या थंडी, दाट धुके आणि भीषण प्रदूषणाच्या तिहेरी संकटात सापडली आहे. रविवारी दिल्ली-एनसीआरमध्ये इतके घनदाट धुके पसरले होते की अनेक भागांमध्ये दृश्यमानता केवळ 50 मीटरपर्यंत मर्यादित राहिली. अक्षरधाम, वझीरपूर, रोहिणी यांसारख्या परिसरांत सकाळपासूनच वातावरण धुरकट आणि गुदमरल्यासारखे होते.

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाल्यामुळे वाऱ्यांची हालचाल जवळपास थांबली आहे. त्यामुळे हवेतले प्रदूषक कण खालीच अडकून राहिले आणि दिल्ली अक्षरशः गॅस चेंबरमध्ये रूपांतरित झाली. वझीरपूर आणि रोहिणी परिसरात एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) 500 च्या पातळीवर पोहोचल्याची नोंद झाली. ही पातळी ‘अत्यंत गंभीर’ श्रेणीत मोडते. काही तज्ज्ञांच्या मते, प्रत्यक्षात AQI याहून अधिक असण्याची शक्यता आहे, मात्र CPCB चे मॉनिटरिंग यंत्र 500 नंतरची नोंद घेत नाही.

या दाट धुक्याचा मोठा परिणाम हवाई वाहतुकीवर झाला. दिल्ली विमानतळावर 40 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली, तर सुमारे 300 विमानांना विलंब झाला. प्रवाशांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागली. रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम दिसून आला असून अनेक भागांत वाहतूक संथ झाली आहे.

प्रदूषणाची गंभीरता लक्षात घेता, दिल्ली-एनसीआरमध्ये एकाच दिवशी ग्रॅप-3 आणि त्यानंतर ग्रॅप-4 लागू करण्यात आले. सीएक्यूएमने शनिवारी आधी ग्रॅप-3 जाहीर केला आणि परिस्थिती न सुधारल्याने काही वेळातच ग्रॅप-4 लागू केला. मात्र इतके कठोर निर्बंध असूनही प्रदूषणात कोणतीही ठोस घट झालेली नाही.

ग्रॅप-4 अंतर्गत 50 टक्के कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम, बीएस-4 जड व्यावसायिक वाहनांवर बंदी, सर्व प्रकारची बांधकामे थांबवणे, शाळा हायब्रीड मोडमध्ये चालवणे, कचरा व इंधन जाळण्यावर बंदी, डिझेल जनरेटर, आरएमसी प्लांट, स्टोन क्रशर, विटांचे भट्टे आणि खाणकामावर निर्बंध लागू आहेत.

दरम्यान, डॉक्टरांनी लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागानुसार पुढील सहा दिवस दिल्लीतील हवा गंभीरच राहण्याची शक्यता असून, सोमवारपासून वाऱ्याचा वेग वाढल्यास काहीसा दिलासा मिळू शकतो. सर्वोच्च न्यायालय 17 डिसेंबर रोजी दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषण प्रकरणावर सुनावणी घेणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा