केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' २०२३ मध्ये प्रदर्शित झाला आणि सिनेमाने बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडले. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक साई पियूष यांच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली म्हणजेच यंदाच्या 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये त्यांच्या कामाची नोंद घेण्यात आले आहे.
कळत नकळतपणे मिळालेला हा सुखद धक्का याविषयी व्यक्त होताना साई-पियूष यांनी म्हटले की, '२०२३ साली 'बाईपण भारी देवा' हा सिनेमा आला आणि या सिनेमाने आम्हाला भरपूर यश अनुभवायला दिलं. चांगल्या गोष्टी त्या सिनेमामुळे आमच्या आयुष्यात घडल्या. गेली पंधरा वर्षे आम्ही या क्षेत्रात काम करतोय, अनेक सिनेमे गाणी हिट झाली. 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' 'शो स्टॉपर म्युझिशियन ऑफ २०२३' मध्ये एकंदरीत भारतीय संगीतकारांपैकी आमचं नाव तेथे होतं, जे सगळ्या रिजनल संगीतकारमध्ये फक्त आमचं नाव आहे, ही आमच्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. कष्ट, मेहनत आणि चांगलं काम झाल्यामुळे त्याची नोंद 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये झाली याचा आम्हाला अभिमान वाटतोय. 'फोर्ब्स मॅगझिन इंडिया' मध्ये आमचं नाव येईल आमच्या मनी ध्यानी सुद्धा नव्हतं. या यशासाठी आम्ही 'बाईपण भारी देवा'चे दिग्दर्शक आणि निर्माते यांचे मनापासून आभार मानतो'.
प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडा पाव', निखिल वैरागर दिग्दर्शित 'आंबट शौकीन' आणि अभ्यंघ कुवळेकर दिग्दर्शित 'गुलाबी' या आगामी मराठी सिनेमातील गाण्यांना साई-पियूष यांनी संगीत दिले आहे. या मराठी सिनेमांमधून नवीन गाण्यांचा आनंद प्रेक्षकांना लवकरच घेता येईल.