जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी आहारात भात हा पदार्थ असतो. अगदी सुरुवातीला तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यावा आणि चाळणीमध्ये निथळत ठेवावा. भात बनवण्यासाठी जाड बुडाचं पातेलं घ्यावं. यात अर्धा चमचा तूप घालावं आणि निथळलेला तांदूळ पातेल्यात टाकून, तुपावर दोन मिनिटांसाठी छान परतून घ्यावा. जितका तांदूळ घेतला असेल त्याच्या सहा पट पाणी मिसळावं आणि मध्यम ते तीव्र आचेवर शिजण्यासाठी ठेवावं. साधारण आठ-दहा मिनिटं झाली आणि तांदूळ बऱ्यापैकी शिजला की भातातील अतिरिक्त पाणी काढून टाकावं.
आता पातेल्यावर झाकण ठेवून भात मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवावा. पाच मिनिटांनी भात मऊ शिजला आहे याची खात्री करून गॅस बंद करावा आणि अजून सात-आठ मिनिटांसाठी तसाच झाकून ठेवून मग सर्व्ह करावा. असा तुपावर परतून घेतलेला आणि पाणी काढून घेतलेला भात पचायला खूप सोपा असतो. मधुमेह असला किंवा जास्त वजन असलं तरी असा भात खाण्यानी त्रास होत नाही.
अर्थात यासाठी तांदूळ सुद्धा हातसडीचे आणि स्थानिक विविधताचे असावे. पारंपरिक पद्धतीनी बनवलेला हा भात आणि प्रेशर कुकरमधला भात यांच्या चवीत आणि पचन क्षमतेमध्ये खूपच फरक असतो. प्रेशर कुकरमध्ये वाफेच्या प्रेशरमुळे भात पटकन शिजत असला तरी तो पचवण्यासाठी पोटातल्या जाठराग्नीला अधिक काम करावं लागतं. यातून स्वयंपाकघरामधला वेळ वाचवण्याच्या नादात पाचक प्रणालीवर भार येत राहतं. कधीतरी घरात ऐन वेळेला पाहुणे आले आणि एखाद्या दिवशी प्रेशर कुकरचा वापर केला तर हरकत नाही. एरवी मात्र असा छान पारंपारिक पद्धतीने बनवलेला भातच सेवन करा आणि निरोगी रहा.