CONGRESS SUFFERS SETBACK AS LEADERS JOIN BJP AHEAD OF LATUR MUNICIPAL POLLS 
महाराष्ट्र

Latur Politics: ऐन निवडणुकीत काँग्रेसला धक्का! लातूरमध्ये माजी नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Municipal Elections: लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Published by : Dhanshree Shintre

लातूरच्या राजकारणात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात असून, अनेक माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यामुळे राजकीय समीकरणे अचानक बदलली आहेत. या घडामोडीमुळे लातूरमध्ये भाजपची ताकद वाढली असून काँग्रेसची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे.

राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून रणनीती आखण्यासाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहेत. उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू असून काही ठिकाणी अधिकृत घोषणा देखील झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी इच्छुक आणि नाराज नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. याच राजकीय घडामोडींचा फटका आता लातूरमधील काँग्रेसला बसला आहे.

भाजपने लातूर महानगरपालिका जिंकण्याच्या उद्देशाने जोरदार ‘इनकमिंग’ सुरू केल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक रविशंकर जाधव आणि पुनीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यांच्यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते हरिश्चंद्र जाधव, अशोक देदे तसेच गनिमीकावा संघटनेचे लक्ष्मीकांत जोगदंड यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या प्रवेशामुळे काँग्रेसच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. लातूर महानगरपालिकेतील १८ प्रभागांमधील एकूण ७० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने, आगामी काळात आणखी पक्षांतराच्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लातूर महानगरपालिकेचा राजकीय इतिहास पाहता, २०११ मध्ये नगरपरिषदेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता मिळवली होती. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपने सत्ता स्थापन केली. त्यामुळे यंदाही काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट आणि चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमुळे काँग्रेस काहीशी कमकुवत झाल्याचे चित्र असून, आता लातूरकर मतदार कोणाच्या गळ्यात सत्तेची माळ घालतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा