इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीनंतर मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला ऐतिहासिक विजय मिळवून दिला आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांच्यासह १४ नगरसेवकांना निवडून देत नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच अजित पवार गटाकडे एकहाती सत्ता सोपवली गेली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप नेते प्रवीण माने आणि नगराध्यक्ष उमेदवार प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का बसला आहे.
भाजप, शरद पवार गटाची राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे गट) आणि इतर पक्षांच्या कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनलकडून लढलेल्या प्रदीप गारटकर यांना १२७ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. तिसऱ्या फेरीअखेर भरत शहा यांना ९,८२५ मते मिळाली, तर गारटकर यांना ९,६९८ मते मिळाली. आघाडीला केवळ ६ नगरसेवक जागांवर समाधान मानावे लागले. निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला आणि विजयश्री मिळवलेल्या भरत शहा व नगरसेवकांची संपूर्ण शहरातून मिरवणूक काढली.
भरत शहा म्हणाले, "जनतेने विकास आणि स्थिरतेचा विश्वास दाखवला. इंदापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काम करू. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि शिक्षण सुविधा सुधारण्याला प्राधान्य देऊ." या विजयाने पुणे जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. अजित पवार गटाला स्थानिक पातळीवर मजबूत आधार मिळाला असून, भाजप-महायुतीला अप्रत्यक्ष धक्का बसला आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यातील हा पराभव भाजपसाठी लक्षणीय आहे. राष्ट्रवादीचे हे यश येत्या निवडणुकांसाठी मोठे बळकटीकरण ठरणार आहे. इंदापूरकरांच्या अपेक्षेनुसार नव्या विकासकामांची सुरुवात अपेक्षित आहे.