Ajit Pawar Budget 2023 Team Lokshahi
राजकारण

...तर हा देशाचा ‘अमृत काळ’ कसा; अजित पवारांचा अर्थसंकल्पावर सवाल

सन २०१८ ते २०२२ या काळात देशाचा ‘जीडीपी’ वाढीचा दर सरासरी अवघा तीन टक्के असताना हा देशाचा ‘अमृत काळ’ कसा होऊ शकतो.

Published by : Sagar Pradhan

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज 2023-24 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. आजच्या या अर्थसंकल्पावर सर्वच देशाचे लक्ष लागून होते. त्यावरच आता बजेट सादर झाल्यानंतर या बजेटवर आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

सन २०१८ ते २०२२ या काळात देशाचा ‘जीडीपी’ वाढीचा दर सरासरी अवघा तीन टक्के असताना हा देशाचा ‘अमृत काळ’ कसा होऊ शकतो. देशाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कररुपाने सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पातून फारसे काही आलेले दिसत नाही, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा ‘चुनावी जुमला’ असणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर होईल, अशी जुनीच घोषणा नव्याने करायला लागणे म्हणजे केंद्र सरकारने स्वत:च आपल्या नाकर्तेपणाची कबुली दिलेली आहे. केंद्रात ‘युपीए’ सरकारच्या सन २००४ ते २०१४ या कालावधीत देशाचा ‘जीडीपी’ दर ६.८ टक्के होता. तर, ‘एनडीए’च्या सन २०१८ ते २०२२ या कालावधीत देशाच्या ‘जीडीपी’ वाढीचा सरासरी दर अवघा तीन टक्के एवढाच आहे. गेल्या चार वर्षाचा ‘जीडीपी’ दर अवघा तीन टक्के असताना देशाचा हा ‘अमृत काळ’ आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री कोणत्या आधारावर म्हणतात, हे कळायला मार्ग नाही. असे देखील ते म्हणाले आहे.

पुढे ते म्हणाले की, वस्तू व सेवा कराच्या वसुलीतील नुकसान भरपाईची महाराष्ट्राची थकबाकी अजून केंद्राने दिलेली नाही. तसेच, वस्तू आणि सेवाकराच्या वसुलीतील नुकसान भरपाई देण्याची मुदत संपलेली आहे. ही मुदत वाढवून देण्याची मागणी राज्याचा अर्थमंत्री असताना सातत्याने केली होती. त्याबाबतही अजून कोणताही निर्णय झालेला नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधेसाठी भरघोस निधी दिल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र, महाराष्ट्रातल्या पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेसह राज्यातील इतर रेल्वे प्रकल्पासाठी तसेच मेट्रोसाठी अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेली आहे का? हे समजायला मार्ग नाही. भाजपाला मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी त्यांची प्राप्तीकराची मर्यादा वाढविण्यासाठी तब्बल आठ वर्षे वाट बघावी लागली. निवडणुकीच्या तोंडावर केवळ चुनावी जुमला करुन प्राप्ती कराची मर्यादा सात लाखांपर्यंत वाढवली असली तरी ती पुरेशी नाही. ही प्राप्तीकराची मर्यादा वाढवताना फसवेगिरी करण्यात आलेली आहे,” असे टीकास्त्र अजित पवारांनी भाजपावर सोडलं आहे.

दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनाचे काय झाले याचे उत्तर या अर्थसंकल्पात मिळालेले नाही. ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणांप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पातील पोकळ घोषणाही हवेत विरुन जातील, असे दिसते. महागाई कमी करण्यासाठी आणि रोजगारवाढीसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस उपाययोजना नाही. अर्थसंकल्पात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्त करण्याची घोषणा झाली. सोन्याचे, चांदीचे, हिऱ्यांचे दागिने महाग झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करायला केंद्र सरकार सोयीस्कर विसरले. यातून त्यांचा प्राधान्यक्रम दिसतो. गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर यांना या अर्थसंकल्पातून काहीही ठोस देण्यात आलेले नाही. देशातील शेती आणि शेतकरी संकटात आहे. सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहे. त्यामुळे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करुन केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव देण्याविषयी अर्थसंकल्पात चकार शब्द काढण्यात आलेला नाही. असं अजित पवारांनी सांगितलं.

देशातील उद्योगपतींची दहा लाख कोटींची कर्ज माफ केल्याबाबतचा साधा खुलासाही अर्थसंकल्पात आलेला नाही. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या आणि कोट्यवधी सामान्य गुंतवणुकदारांना देशोधडीला लावणाऱ्या देशातल्या एका बड्या उद्योजकाच्या प्रकरणात केंद्र सरकार हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. तसेच, महानगरपालिकेने केलेल्या कामांची उद्घाटने तर धुमधडाक्यात झाली. पण, मुंबईला अर्थसंकल्पातून विशेष काही मिळाल्याचे सध्या तरी दिसत नाही. एकूणच या अर्थसंकल्पाने महाराष्ट्रासह देशाची घोर निराशा केलेली आहे. अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

FASTag : फास्टॅग नसल्यास आता वाहन काळ्या यादीत

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार

Pune : पुण्यात कोयते, तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस; 7 ते 8 जणांकडून तरुणावर कोयता, तलवारीने वार

Sanjay Gaikwad : आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरण; संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल