राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधीच अजित पवारांकडून 30 जूनला एक याचिका तयार करण्यात आली होती. या याचिकेत अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आता हा ठराव निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचा वाद आता निवडणूक आयोगात
राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद आता निवडणूक आयोगात येऊन पोहोचला आहे. दोन्ही गटाकडून आता पक्षाच्या चिन्ह आणि नावावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग दोन्ही बाजूची भूमिका ऐकून घेऊन निर्णय देईल. जवळपास तीन महिने सुनावणी सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या याचिकेत नेमकं काय म्हटलं आहे?
अजित पवारांकडून 30 जूनला एक याचिका तयार करण्यात आली होती. ही याचिका केंद्रीय निवडणूक आयोगात दाखल करण्यात आली होती. ही याचिका आज निवडणूक आयोगाला मिळाली आहे. 40 सदस्यांचा पाठिंबा असल्याचं या याचिकेत स्पष्टपणे म्हटलं आहे. तसेच अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आहेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.