केंद्र सरकारने आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 औषधांवर बंदी घातली आहे.
केंद्र सरकारने 3 जून रोजी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवाल दिल्यानंतर सरकारनं हे मोठं पाऊल उचललं आहे. एका गोळी किंवा औषधामध्ये एकापेक्षा जास्त घटक एकत्र असल्यास, अशा औषधांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधे म्हणतात. या औषधांना कॉकटेल औषधे (Cocktail Drug) असंही म्हटलं जातं. यामध्ये पॅरासिटामॉल आणि निमेसुलाइड यांसारख्या मोठ्या प्रमाणावर विकल्या जाणार्या औषधांचा समावेश आहे. ही औषधे लगेच आराम देतात पण यामुळे आरोग्याचं नुकसान होण्याचा धोका जास्त आहे.
'या' औषधांवर बंदी
निमेसुलाइड + पॅरासिटामॉल
क्लोरफॅनिरामाइन + कोडीन सिरप
फॉल्कोडाइन + प्रोमॅथाजीन
एमॉक्सिसिलिन + ब्रॉमहेक्सिन
ब्रॉमहेक्सिन + डॅक्सट्रोमेथॉर्फन + अमोनियम क्लोराइड मेंथॉल
पॅरासिटामोल + ब्रॉमहेक्सिन फॅनिलेफ्राइन + क्लोरफेनिरामाइन + गुइफॅनेसिन
सालबुटामॉल + क्लोरफॅनिरामाइन
तज्ञ समितीने आपल्या सल्ल्यामध्ये म्हटले की, एफडीसी औषधांचे कोणतेही वैद्यकीय औचित्य नाही आणि ते मानवांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे, व्यापक सार्वजनिक हितासाठी, 14 FDC चे उत्पादन, विक्री किंवा वितरण प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. ही बंदी 940 ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायद्याच्या कलम 26A अंतर्गत लागू करण्यात आली आहे.
FDC औषधी काय आहेत? –
दोन किंवा अधिक औषधी मिसळून तयार केलेल्या औषधांना FDC म्हणतात. त्यांना कॉकटेल औषधे देखील म्हणतात. 2016 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तज्ञांच्या समितीने सांगितले की ही औषधी तज्ज्ञांच्या सल्लाशिवाय रुग्णांना विकली जात आहेत. त्यावेळी सरकारने ३४४ औषधांच्या कॉम्बिनेशनच्या निर्मिती, विक्री आणि वितरणावर बंदी घालण्याची घोषणा केली होती.