आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी आझाद मैदान गाठलं आहे. मानखुर्द आणि चेंबूरमध्ये झालेल्या भव्य स्वागतानंतर हजारोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले. यावेळी विरोधकांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलानाला आणि मागणीला पाठिंबा देत वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. दरम्यान आंदोलनावरुन कुणीही राजकीय पोळी भाजू नका असा इशारा देत मुख्यमंत्री फडणवीसांनी जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
याचपार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या आंदोलनात त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात जो काही योग्य मार्ग काढता तो काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे आपल्याला देखील माहित आहे. आम्ही एक एमपावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्याठिकाणी आहे. या उपसमितीला यापूर्वी ज्याकाही मागण्या आलेल्या आहेत".
"त्या आम्ही अग्रेशित केलेल्या आहेत. ते ही त्याच्यावर विचार करतायत कायदेशीर मार्ग काढावा लागेल नुसत आश्वासन देऊन चालणार नाही. कायदेशीर आणि संविधानाने मार्ग कसे काढता येतील यावर मी, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आम्ही विचार करत आहोत. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत, आमच्या मनात काहीच शंका नाही".
"पण काही लोकं ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लागलं पाहिजे असे स्टेटमेंट करत आहेत. आंदोलनावरुन कुणीही राजकीय पोळी भाजू नका. त्याने तुमच तोंड भाजेल. 2 समाजात वाद पेटवण्याचा काहींचा प्रयत्न आहे, मनोज जरांगे यांनी देखील असंच आव्हान केलं होत की, कोणीच अलोकतंत्रपणाने किंवा आडमुठेपणानं वागू नये". मनोज जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे.