थोडक्यात
सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर
हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी आमदार पवार यांनी केली
कर्जत-जामखेडमध्ये विजपुरवठा खंडीत
मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. राज्यातील अनेक भागांत शेतातल्या पिकांसह जमीनीही वाहून गेल्या आहेत. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपयांची मदत जाहीर केलीयं. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या मदतीच्या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलायं. एवढ्या अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? असा थेट सवाल पवार यांनी ट्विटद्वारे केलायं.
आमदार रोहित पवार ट्विटमध्ये म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 200 कोटींची मदत केल्याचं सांगितलं, पण मदत कोणत्या दराने दिली हे त्यांनी सांगायला हवं, असा खोचक टोला पवार यांनी लगावलायं. तसेच 31.5 लाख शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींची मदत म्हणजे सरासरी शेतकऱ्याला 7000 रुपये दिले आहेत. शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत 8500 प्रती हेक्टर म्हणजेच 3400 रुपये एकरी प्रमाणे देण्यात आलीयं. एकरी 3400 रुपयांत काय होणार? तुमच्या सरकारी घरातील बेडरुमची गादी आणि सोफा 20 लाखाचा आणि आमच्य उध्वस्त शेतकऱ्याला एकरी 3400 रुपये मदत…अलिशान सरकारला एवढी तुटपुंजी मदत शोभते का? असा थेट सवाल पवार यांनी केलायं.
राज्यातील शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि सर्व मंत्री हेक्टरी 50 हजार रुपये मदत देणार की नाही? यावर बोलायला तयार नाही, ओल्या दुष्काळात कोरड्या घोषणा आणि खोटी आश्वासने नको तर ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी 50 हजारांची मदत देण्याची मागणी आमदार पवार यांनी केलीयं.
सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं
अतिवृष्टीमुळं माझ्या मतदारसंघात सुमारे अडीचशेहून अधिक वीजेचे खांब भुईसपाट झाले आहेत. काही ठिकाणी डीपीही वाहून गेल्या आहेत. त्यामुळं वीज पुरवठ्याचा अनेक भागात खोळंबा झालायं. पिण्याच्या पाण्यासाठीही पंप सुरु करता येत नाही, मोबाईलची चार्ज करता येत नाहीत. त्यामुळं लोकांना खूप अडचणीला सामोरं जावं लागतंय. याबाबत माहिती घेतली असता यापूर्वी केलेल्या विजेच्या विविध कामांचीच बिलं सरकारने न दिल्याने कंत्राटदार आता दुरुस्तीची आणि नवीन कामं करण्यास तयार नाहीत. या बाबीकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं, ही विनंती असल्याचंही पवार म्हणाले आहेत.