राजकारण

अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंचं पत्र; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु, अंधेरी पोटनिवडणूक भाजपने लढवू नये, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेने आम्हाला पाठिंबा द्यावा यासाठी आज आशिष शेलार राज ठाकरे यांची भेट घेऊन आले. त्यावेळेस अशा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवार उभा करत नाही आणि पाठिंबाही देत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यांनी उमेदवार न देण्याची विनंती ही शेलारांकडे केली. आता मला पत्र देत ही विनंती केली आहे. परंतु, भारतीय जनता पार्टीमध्ये मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही. ठाकरे यांनी दिलेल्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची आणि वरिष्ठांची चर्चा करावी लागेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

आम्ही उमेदवार घोषित केला आणि उमेदवारी अर्ज देखील भरला आहे. यापूर्वीही अशा काही पोटनिवडणुकांमध्ये आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली. तर त्यावेळी आम्ही अशी भूमिका घेतली होती. आर आर पाटील यांच्या वेळी देखील आम्ही विधान परिषदेत भूमिका घेतली. पण, या स्टेजला आता त्या संदर्भात काही भूमिका घ्यायची असेल तर मला घेता येत नाही. पक्षात या संदर्भात चर्चा करावी लागेल. आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा करावी लागेल. जरूर आम्ही या पत्राचा गंभीर विचार करू. मात्र, निर्णय जो घ्यायचा आहे तो चर्चेअंती घेता येईल, असे फडणवीसांनी सांगितले आहे.

दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) व भाजप-शिंदे गट सामना रंगणार होता. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिंदे गट-भाजपा तसेच उद्धव ठाकरे गट पूर्ण ताकदीने मैदानात उतरले असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. अशात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेते आशिष शेलार यांच्या भेटी घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोटनिवडणुकीत मनसे भाजपला पाठींबा देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत भाजपने अंधेरीची निवडणूक लढवू नये, अशी मागणी केली आहे. यामुळे राजकीय एकच चर्चा रंगली आहे.

शिवसेनेकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा

विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्ष कारवाई करण्याची शक्यता

Abdul Sattar : विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ते राजकीय द्वेषापोटी बोलतात

शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस