राजकारण

...असे ढोंगी सावरकर भक्तांना का वाटत नाही : संजय राऊत

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वीर सावरकरांबद्दल विधानावर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. याविरोधात भाजप-मनसे रस्त्यावर उतरली होती. अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून भाजपवर निशाणा साधला आहे. वीर सावरकरांवर नाहक टीका करून राहुल गांधी यांनी वादळ ओढवून घेतले. ‘भारत जोडो’ यात्रेचा तो अजेंडा नव्हता. भारतीय जनता पक्ष सावरकरांच्या अपमानाविरुद्ध रस्त्यावर उतरला. सावरकरप्रेमाचे हे ढोंगच म्हणावे लागेल. संघ सावरकरांचा कठोर टीकाकार राहिला, पण आज राजकीय स्वार्थासाठी भाजप सावरकरवादी झाला, असे राऊतांनी म्हंटले आहे.

तुम्ही वारंवार लोकांच्या श्रद्धांना असे का डिवचता व भाजपला विषयांतर करण्यासाठी हत्यार का देता? मी स्वतः तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होतो. या तुरुंगातही अनेक स्वातंत्र्यवीरांचा मुक्काम 1947 पर्यंत होता. बेहिशेबी संपत्तीच्या खटल्यात किंवा मनीलाँडरिंग प्रकरणाचा खोटा गुन्हा लादून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली नव्हती. भारतमातेच्या पायातील पारतंत्र्याच्या बेडय़ा तोडण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. त्यासाठी त्यांना अंदमानचे काळे पाणी भोगावे लागले!

अटकेत असलेला कोणताही बंदी त्याच्या सुटकेसाठी हरतऱहेचे कायदेशीर प्रयत्न करीत असतो. 10 वर्षांपेक्षा जास्त काळ अंदमानात नरकयातना (देशासाठी) भोगल्यावर सावरकरांनी ‘डावपेच’ म्हणून दिलगिरी व्यक्त करून सुटकेचा मार्ग निवडला असेल तर त्यास शरणागती-माफीनामा म्हणता येणार नाही. आज ‘ईडी’सारख्या स्वतंत्र हिंदुस्थानातील तपास यंत्रणांच्या भयाने भले भले एका रात्रीत ‘स्वदेशी’ सरकारला शरण जातात. पक्ष बदलतात. स्वतःच्या निष्ठा विलीन करतात. सावरकरांनी दशकभर अंदमानात ज्या यातना सहन केल्या त्या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी, असा टोला संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ने जी सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास निर्माण केला त्यावर सावरकरांवरील भाष्याने पाणी पडले. पंतप्रधान मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंना लक्ष्य केले, तर राहुल गांधी वीर सावरकरांना लक्ष्य करीत आहेत. स्वातंत्र्य लढय़ात दोघांचे योगदान तोलामोलाचे आहे. सावरकरांनी तर सर्व सुखांचा त्याग करून अंदमानचा मार्ग स्वीकारला. पुन्हा तुरुंग काय असतो याची कल्पना नसलेले सावरकरांच्या सुटकेवर बोलतात तेव्हा आश्चर्य वाटते. सावरकरांचे वंशज एरवी कोठे दिसत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांवर वक्तव्य केले की त्यांचा चेहरा वृत्तवाहिन्यांवर दिसतो. आठ वर्षांपासून भाजपचे राज्य केंद्रात आहे, पण सावरकरांना ‘भारतरत्न’ने सन्मानित करून माफीचा डाग धुऊन काढावा असे ढोंगी सावरकर भक्तांना वाटत नाही, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

वीर सावरकरांचे क्रांतिकार्य महान होते, पण आज भाजपास सावरकरप्रेमाचा जो उमाळा आलाय ते सरळ सरळ ढोंग आहे. पंतप्रधान मोदी नेहरूंच्या बदनामीची भूमिका सोडत नाहीत. राहुल गांधींनी सावरकरांना त्याच कारणासाठी पकडले, हा देशाचा अजेंडा नाही. अशाने भारत कसा जोडणार, असा सवालही संजय राऊतांनी राहुल गांधींना विचारला आहे.

साताऱ्यात देवेंद्र फडणवीस कडाडले, म्हणाले, " उदयनराजेंनी जी कामे हातात घेतली..."

"...म्हणून मी तुमच्याकडे मत मागायला आलोय", साताऱ्याच्या सभेत अजित पवारांनी सांगितलं खरं कारण

IPL 2024 : चेन्नई आणि लखनऊ संघाला मोठा धक्का! स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं?

टी-२० वर्ल्डकपआधी भारताच्या अडचणी वाढल्या, कर्णधार रोहित शर्माला दुखापत, 'या' खेळाडूनं दिली मोठी अपडेट

"४ जूनला आमचं सरकार दिल्लीत बसणार म्हणजे बसणार"; रत्नागिरी-चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंनी पेटवली 'मशाल'