मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर पोलिसांकडून एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाला मोठा दिलासा मिळाला असून आता हे आंदोलन उद्या (30 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलिसांकडे उपोषणाची मुदत वाढवून देण्याचा अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार यापूर्वी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची परवानगी होती. मात्र आंदोलनाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि परिस्थिती पाहता अखेर पोलिसांनी आणखी एक दिवसाची मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले आहेत. संपूर्ण आझाद मैदान भगव्या झेंड्यांनी दुमदुमून गेले आहे. घोषणाबाजी, कीर्तन, ढोल-ताशे यामुळे मैदानात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आहे. आंदोलनाची मुदत संपण्याआधीच मुदतवाढ मिळाल्यामुळे आंदोलकांमध्ये उत्साह दाटून आला आहे. संध्याकाळी सात वाजता मनोज जरांगे आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ते विश्रांती घेत असले तरी उपोषण सुरू आहे. यामुळे पुढील रणनीती काय असणार, हे सर्वांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
सरकारकडून हालचाली सुरू असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ जरांगे यांना भेट देऊ शकते, अशी चर्चा आहे. तथापि आत्तापर्यंत राज्य सरकारमधील कुठलाही मंत्री किंवा उपसमिती सदस्य प्रत्यक्ष आंदोलनस्थळी दाखल झालेला नाही. महाविकास आघाडीतील आमदार आणि खासदार मात्र जरांगे यांना भेटून गेले आहेत. आज रात्री उशिरापर्यंत किंवा उद्या सकाळी सरकारमधील प्रतिनिधी जरांगे यांची भेट घेतील का, याकडे लक्ष लागलं आहे. त्याचबरोबर आज मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार होती. या बैठकीतून काय निष्पन्न होते, यावर उद्याच्या चर्चेचं स्वरूप ठरणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंडमध्ये दौऱ्यावर असताना फोनवरून जरांगे यांच्या गाड्यांची आणि हालचालींची माहिती घेतली. त्यामुळे “अजित पवारांना जरांगे यांच्या आंदोलनाची धास्ती वाटतेय का?” असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आझाद मैदानावर रात्रभर आंदोलन सुरू राहणार आहे. उद्या पुन्हा एकदा मुदतवाढीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत, यात शंका नाही.