Nagaraparishad-Nagarpanchayat Election 2025: धर्माबादमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप; कोपरगाव, भुसावळमध्ये मतदान केंद्रांवर गोंधळ
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यातील 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया सुरू आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होत असून, काही ठिकाणी तणावपूर्ण घटना समोर आल्या आहेत. नांदेडच्या धर्माबाद, अहिल्यानगरच्या कोपरगाव आणि जळगावच्या भुसावळ येथे मतदानादरम्यान गोंधळ झाल्याचे वृत्त आहे.
धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानापासून रोखल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलावून मतदान करू नका, असे सांगण्यात आल्याचा दावा काही मतदारांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र प्रत्यक्षात कोणताही मोठा वाद किंवा गोंधळ झाल्याचे दिसून आले नाही. भाजपाला मतदान होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान न करण्याची विनंती करण्यात येत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.
कोपरगावमध्ये उमेदवारांमध्ये बाचाबाची
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथेही मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. एस. जी. महाविद्यालयातील मतदान केंद्रावर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर प्रभाव टाकण्याचा आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केला. पोलिसांच्या उपस्थितीतच वाद वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर केले. यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे काही काळ मतदान प्रक्रियेत तणाव निर्माण झाला.
भुसावळमध्ये पोलीस आणि कर्मचाऱ्यांत शाब्दिक वाद
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे प्रभाग क्रमांक 11 ब मधील अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर पोलीस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. मतदान केंद्रावर नियुक्त वाहन कर्मचारी वारंवार वाहन ने-आण करत असल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. मतदान सुरू झाल्यानंतर वाहन केंद्रातून साहित्य आणण्यासाठी बाहेर जात असल्याने पोलिसांनी आक्षेप घेतला. वाहनावर परवानगी पत्र असतानाही पोलिसांनी मतदान केंद्रावरच वाहन उभे ठेवण्याच्या सूचना दिल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला.
आज ज्या पालिका व नगरपंचायतींसाठी मतदान
आज राज्यातील अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली-प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, अंजनगाव, मंगळवेढा, महाबळेश्वर, फलटण, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, वसमत, अंजनगाव सूर्जी, बाळापूर, यवतमाळ, वाशिम, देऊळगावराजा, देवळी आणि घुग्घूस या 23 नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान, काही ठिकाणी किरकोळ तणावाच्या घटना घडल्या असल्या तरी बहुतेक ठिकाणी मतदान शांततेत सुरू असल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यातील २३ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी मतदान सुरू
धर्माबादमध्ये मतदारांना कोंडल्याचा आरोप
कोपरगाव व भुसावळ येथे मतदान केंद्रांवर गोंधळ
बहुतेक ठिकाणी मतदान शांततेत सुरू असल्याचे प्रशासनाचे म्हणणे
