फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का? राऊतांचा भाजपला खोचक सवाल
स्वप्निल जाधव | नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेत्या स्मृती ईराणी यांनी केला आहे. यावर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर, फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का, असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मित्रत्वाचा हात पुढे करणं या देशात बंधने नाही आहेत. फ्लाईंग किस म्हणजे लव्ह जिहाद आहे का? ज्यांना प्रेमाची घृणा आहे आणि ज्याचे राजकारण द्वेषाच्या भाषणाने आहे. त्यांना फ्लाईंग कीस वेदनादायी वाटू शकते. राहुल गांधींनी संपूर्ण सदनाला म्हणजेच देशाला फ्लाईंग कीस दिला. मोहब्बत की दुकान राहूल गांधी यांनी उघडलेलं आहे. फ्लाईंग कीस हे गुलाबाचे फुल आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
राहुल गांधी लोकसभेत बोलत असताना गोंधळ झाला नाही का? मी बोलायला उभा राहिलो तर माझा माईक बंद करण्यात आला. या देशात अशा प्रकारे संसद कधीच चालवली नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, ही आता सुरुवात होतेय. आधी पाटणा आणि बंगळुरूला बैठक झाली. या ठिकाणी आमचीच म्हणजेच इंडियाची सरकारे होती. आता आम्ही इथे आमचं सरकार नाहीये. तरी आम्ही हे आव्हान स्वीकारलंय. या बैठकीचे यजमान शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आहेत. महाविकास आघाडी आम्ही एकत्र आहोत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी प्रत्येकानं आयोजनाची जबाबदारी घेतली आहे. काल पहिली बैठक झाली. आता ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी ही बैठक होणार आहे, अशी माहितीही संजय राऊतांनी सांगितली आहे.